निलंगा: लक्ष्मण पाटील
तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दुसरीकडे शेतमजुरांच्या हातालाही काम नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण झाले आहे, अशा गंभीर दुष्काळी परिस्थितीत फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतकरी व शेतमजूर अक्षरश: हैराण झाले आहेत.
पेरणीपासून मशागतीपर्यंत मोठा खर्च करून शेतक-यांनी खरीप पिके उभी केली; मात्र पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिके करपून गेली. त्यामुळे उत्पादन हातातून गेले असून, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्नही शिल्लक राहिलेले नाही. संसाराचा गाडा कसा ओढायचा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा आणि कर्जाची परतफेड कशी करायची, या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. शेतक-यांप्रमाणेच शेतमजुरांची परिस्थितीही बिकट आहे. पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाल्याने मजुरांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असताना कर्जवसुलीचा तगादा त्यांच्या अडचणीत आणखी भर घालत आहे.
पैसे देण्याची टाळाटाळ नाही; मात्र उत्पन्नच नाही
शेतकरी व शेतमजूर कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ करीत नाहीत. मात्र दुष्काळामुळे शेतक-यांचे पीक पूर्णपणे हातचे गेले असून, शेतमजुरांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या हातात पैसेच नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांच्या कर्जवसुलीला स्थगिती देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित सहकार विभागाच्या अधिका-यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा शासन निर्णय तातडीने जारी करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.
















