पुणे : प्रतिनिधी
सहकारी बँकांनी काळानुसार दैनंदिन व्यवहारात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. आज एकीकडे गुंतवणूकदार संख्या आणि कर्ज व्यवहार वाढत आहेत.हे लक्षात घेता ग्राहक साक्षरता आणि त्यांना खात्री देणे आवश्यक आहे. यासाठी ‘बँकिंग साक्षरता’ पुस्तक उपयुक्त आहे असे मत आर.बी.आय. आणि नाबार्ड संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर लिखित ‘बँकिंग साक्षरता’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेशाम चांडक, नॅफकबचे उपाध्यक्ष मिलिंद काळे, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, सहकार भारती प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, ‘सहकार सुगंध’ मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि पुस्तकाचे लेखक गणेश निमकर व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे आणि राज्य सहकारी बँक प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आले. पुस्तक प्रकाशन झाल्यावर ‘बदलते बँकिंग’ यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
मराठे यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीमध्ये देशातील किमान ५० टक्के जनता बँकिंग क्षेत्रापासून दूर आहे त्याचबरोबर आर्थिक साक्षरता वाढणे गरजेचे आहे. एकीकडे गुंतवणूकदार संख्या वाढत आहे तर कर्ज व्यवहार वाढत आहेत, दुसरीकडे व्याजदर कमी होत आहे. या सर्व बाबतीत साक्षरता होणे आवश्यक असून त्यासाठी पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
पुस्तकाचे लेखक निमकर यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका मांडताना सांगितले की, बँकिंग क्षेत्राबाबत आजवर तीन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.केवळ सहकारी बँक नाही तर सर्व बँकांचा विचार करण्यात आला आहे. संपादक कुलकर्णी यांनी स्वागत करताना स्पष्ट केले की, जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. गेली काही वर्षे पुण्यात पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. सकारात्मक सहकार सर्वत्र पोचावा हा त्यामागचा हेतू आहे असे ते म्हणाले.
सुरुवातीला भारत मातेचे पूजन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

