लातूर : प्रतिनिधी
१९७८ साली पुण्याच्या शिवाजीनगर भागात बँक ऑफ महाराष्ट्राच्या ‘लोकमंगल’या मुख्यालयाच्या वास्तूची स्थापना झाली. ही वास्तू पुणेकरांच्या, बँकेच्या असंख्य ग्राहकांच्या आणि बँकेत कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी कर्मचा-यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा, अभिमानाचा, जिव्हाळ्याचा विषय असताना बँकेच्या व्यवस्थापनाने मात्र आता या वास्तूतील बँकेचे मुख्यालय बाणेर येथे खाजगी इमारतीत भाड्याने स्थलातरीत करण्याचा घाट घातला आहे. त्यास बँकेच्या कर्मचा-यांनी कडाडून विरोध केला असून दि. २३ सप्टेंबर रोजी बँकेच्या सर्व शाखांतील कर्मचा-यांनी बॅज लावून कामकाज केले.
बँकेच्याए सध्याच्या व्यवस्थापनाने बँकेचे मुख्यालय लोकमंगल या स्वत:च्या वास्तूमधून बाणेर स्थित खाजगी मालकीच्या इमारतीत २ कोटी रुपयांपेक्षा अधिक दरमहा भाडे देऊन स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांत केली जाणार आहे. असे घडले तर बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील सर्व सरकारी बँकांपैकी एकमात्र असेल जिचे मुख्यालय भाड्याच्या जागेत असेल. विशेष म्हणजे असे करण्या मागचा बँकेच्या व्यवस्थापनाचा उद्देशच स्पष्ट होत नाही. त्यामुळे व्यवस्थापनाच्या या निर्णयाला बँकेच्या आजी-माजी कर्मचा-यांनी कडाडून विरोध केला आहे.
















