मुंबई : प्रतिनिधी
भाजपकडे निवडणूक लढवणा-या इच्छुकांची संख्या भरपूर आहे. त्यात महायुतीमुळे अनेक जागा सोडाव्या लागत असल्याने भाजपमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. काहींनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केले आहेत. याची गंभीर दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. पक्षातर्फे अधिकृत घोषणा झाल्याशिवाय कोणीही उमेदवारी अर्ज भरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महायुतीचे २७७ जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येणार आहे. त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चा बंद होतील. कदाचित एखादी यादी आज रात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणी घाई करू नये, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे आवाहन करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांना अप्रत्यक्ष कारवाईचा इशारा दिला आहे.