महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवार (३० डिसेंबर) ही अंतिम तारीख असून सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी लपवाछपवीचा मार्ग स्वीकारला आहे. कारण त्यांच्यासमोर बंडोबांचे आव्हान कायम आहे. विशेष म्हणजे ही बंडखोरी सर्वपक्षीय आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही तेच चित्र आहे. सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांत बंडखोरी उफाळून आली. त्यामुळे बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर उभे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.), ठाकरे सेना व मनसे यांनी आपले काही उमेदवार जाहीर केले. मात्र यात काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेल्याने सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी नाराजीचा सूर आळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (श. प.) मुंबईतील जे मोजके माजी नगरसेवक होते, त्यातील मुंबई अध्यक्ष राखी जाधव, बबन कनावजे, धनंजय पिसाळ, मनीषा रहाटे या चारही माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुस-या पक्षात प्रवेश केला. राखी जाधव यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपची घाटकोपरमध्ये ताकद वाढली आहे. राखी जाधव २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३१ मधून निवडून आल्या होत्या. मनसे नेत्या स्नेहल जाधव, भाजप नेत्या अर्चना पाटील यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. ठाकरे सेनेचे चंद्रकांत वायंगणकर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे गटात प्रभाग क्र. ९५ च्या उमेदवारीवरून आमदार अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. परब माजी नगरसेवक चंद्रकांत वायंगणकर यांच्यासाठी आग्रही होते,
तर सरदेसाई यांनी दिवंगत नेते श्रीकांत सरमळकर यांच्या जावयासाठी अर्ज मागितल्याने परब संतप्त झाले. अखेर परब यांनी माघार घेतल्याने शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, या वेळी परब आणि सरनाईक यांच्यातील अंतर्गत मतभेद समोर आले. मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपने सावध भूमिका घेतली आहे. सोमवारी भाजपने ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला २२७ पैकी दीडशेहून अधिक जागा लढण्याची भाजपची तयारी होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी झाली होती. शिवसेनेने याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर दोन्ही पक्षांत ८-१० दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. अखेर भाजप आणि शिवसेनेत २०७ जागांवर एकमत झाले. भाजपच्या पहिल्या यादीत ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना प्रभाग क्र. १ मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना वॉर्ड क्र. १०७ मधून तिकिट देण्यात आले आहे. २०७ जागांपैकी १२८ जागा भाजप लढवणार आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला ७९ जागा आल्या आहेत. अजून २० जागांवर दोन्ही पक्षांमध्ये तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्र. १३५ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदरसिंग यांना मुंबईतील वॉर्ड क्र. ४७ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेने सोमवारी सायंकाळपर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करताच निश्चित १२५ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. उमेदवार पळवापळवी टाळण्यासाठी ठाकरे सेनेने महायुतीला चकवा देत एबी फॉर्मचे गुपचूप वाटप केले. ठाकरे सेना १५० जागा लढवणार आहे म्हणे. मनसे ७० जागा लढवणार आहे. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने सोमवारी ८७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
या यादीत खासदार चंद्रकांत हंडोरे यांची कन्या प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग क्र. १४० मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आमदार अस्लम शेख यांच्या मुलाला आणि बहिणीला उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक व छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली असून महायुतीतील घटकपक्ष आपल्या सोयीनुसार युती करून निवडणुका लढवणार असल्याचे चित्र आहे. संभाजीनगरमध्ये भाजपसोबत युती करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता आहे. पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, भाजप सकारात्मक प्रतिसाद देत नसेल तर एकनाथ शिंदे युतीसाठी पर्यायी मार्ग काढतील. शिवसेनेने ४१ जागांचा प्रस्ताव दिला होता. सुमारे ८-९ बैठका झाल्या तरी त्यातून ठोस मार्ग निघाला नाही. नाशिक महानगरपालिकेसाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा न सुटल्याने महायुतीत फूट पडली असून शिंदे आणि अजित पवार गट एकत्र लढणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी जाहीर केले.
भाजपने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला स्वतंत्र विचार करावा लागत आहे, असे ते म्हणाले. पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्रितरीत्या लढणार आहेत तर भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या राजकारणात पक्षांतराचा जोरदार सामना सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या धक्क्याची परतफेड अजित पवारांनी केली आहे. भाजपच्या काही माजी नगरसेवकांना आणि पदाधिका-यांना त्यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश दिला. भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार, किरण बारटक्के, धनंजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक हरणावळ, भाजपचे संदीप ज-हाड, सुनीता गलांडे यांनीही हातात घड्याळ बांधले. भाजपने बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन सोमवारी यादी जाहीर न करता उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. पक्षाने अशा प्रकारे थेट फॉर्म दिल्याने इच्छुकांचा चांगलाच गोंधळ उडाला. पत्ता कट झालेल्या माजी नगरसेवकांनी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जागावाटप व उमेदवार जाहीर करण्यास जाणीवपूर्वक उशीर केल्याचे दिसते. बंडखोरी टाळण्यासाठी हा युक्तिवाद केल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यामागची कारणे अधिक खोलवर आहेत. एकाच जागेसाठी अनेक इच्छुक, ऐनवेळी आयात उमेदवारांना दिली जाणारी तिकिटे आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणा-या निष्ठावंतांना डावलले जाणे यामुळे नाराजी वाढली. पूर्वीसारखी पक्षांतर्गत शिस्त आज कुठल्याच पक्षात दिसत नाही. कुंपणावर असलेले नेते संधिसाधूपणे पक्षांतर करून तिकिट मिळवतात आणि त्यासाठी विकास व समाजसेवेचे गोंडस लेबल लावले जाते. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांना ‘कामाला लागा’ असा संदेश देत प्रचार व खर्चाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाते. निर्णय मात्र मोजक्यांच्या हातात राहतो. परिणामी बंडखोरी होते. नाराजी दडपली जाते, पण ती नष्ट होत नाही!

