माजी मंत्री आमदार अमित देशमुख, भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको
लातूर : प्रतिनिधी
लातूर येथे आयोजित भाजपाच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आदरणीय विलासराव देशमुखसाहेबांबद्दल कारण नसताना दुर्दैवी विधान केले. या विधानाचा तीव्र निषेध होत आहे. या वक्तव्यामुळे लातूरकरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे लातूरसह राज्यातील अनेक भागांतून याचा निषेध नोंदवला जात आहे. आता यावरून अखिल भारतीय छावा संघटनेने बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी लातूर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारचा बंद मागे घ्यावा, आपण लोकशाही मार्गाने येत्या काळात त्यांना उत्तर देऊ, असे म्हटले.
मला असे समजले की, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी लातूरकरांनी बुधवारी लातूर बंदची हाक दिली. मात्र भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये, असे मला मनापासून वाटते. आदरणीय साहेबांच्या विचारांवर ठाम राहून आपले कार्य आपण सुरू ठेवले पाहिजे, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.
…तर लातूरकरांचा अपमान
करण्याचे धाडस होणार नाही
उद्याचा बंद न करता, लोकशाहीतील योग्य आणि सुसंस्कृत मार्गाने आपण त्यांना येत्या काळात उतर देऊ. जेणेकरून भविष्यात कोणीही मा. विलासराव देशमुखसाहेबांचा किंवा लातूरकरांचा अपमान करण्याचे धाडस करणार नाही. हे माझे लातूरकरांसाठी नम्र आवाहन आहे, असे माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चुकीचे वक्तव्य करायला नको होते. त्यांचे हे विधान पाहून राजकारण आता कुठल्या स्तरावर चालले आहे, हाच प्रश्न सगळ््यांना पडला आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करतो, महाराष्ट्रातही सर्वत्र निषेध होत आहे, अशा शब्दांत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी संताप व्यक्त केला.

