21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्र‘बटेंगे तो कटेंगे’वर भाजपमधूनच विरोध

‘बटेंगे तो कटेंगे’वर भाजपमधूनच विरोध

बीड : प्रतिनिधी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिली होती. आता हीच घोषणा आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन केली आहे. त्यामुळे याच घोषणेची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे. अशात आता याच घोषणेला पंकजा मुंडे यांनी विरोध केला आहे. माझे राजकारण वेगळे आहे. त्यामुळे मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही, असे पंकजा मुंडे एका मुलाखतीत बोलल्या होत्या.

पंकजा मुंडे यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझं राजकारण वेगळं आहे. मी भाजपची आहे, म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही, तसेच आपण विकासावर काम केले पाहिजे असे माझे मत आहे. प्रत्येक माणसाला आपलेसे करणे हे नेत्याचे काम असते. त्यामुळे असा कुठलाही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही,असे म्हणत पंकजा मुंडे ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला विरोध दर्शवला होता.

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या भूमिकेनंतर आता विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. योगी आदित्यनाथ यांचा नारा म्हणजे भाजपला पराजयाची भीती आहे. ज्या ज्या वेळेस विकासाचे मुद्दे नसतात, विरोधात लाट असते ‘बटेंगे तो कटेंगे’, भारत-पाकिस्तान करतात. भाजप अडचणीत आला की असे विधान करतात. तसेच पंकजा मुंडे ओबीसी नेत्या असून पुरोगामी विचाराला बाजूला सारून पंकजा मुंडे, अजित पवार यांना राजकारण करता येणार नाही, त्यामुळे त्यांना विरोध करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी देत भाजपवर निशाणा साधला होता.

विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर पंकजा मुंडे काहीशा नरमल्या असून त्यांनी या घोषणांवर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखादी घोषणा दुस-या राज्यात वेगळ्या अनुषंगाने बोलली जाते. त्याच घोषणेचा राज्यात विरोधक वेगळा अर्थ काढतात. आणि विकासाच्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी विरोधकांना हा आयता मुद्दा मिळतो. विरोधकांकडे दाखवायला काही नसल्याने ते हे मुद्दे उचलून धरतात. पण अशा मुद्यांमुळे काही गोष्टी भरकटल्या नाही पाहिजेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

त्याचसोबत एक आहोत तर सेफ आहोत, म्हणजे आम्ही तीन पक्ष आहोत, आम्ही एक आहोत. महायुती एक आहे, मतदारांनी एक राहावे.. त्यामुळे या घोषणांमुळे कुणाला धमकावणे, कुणाला दुखावणे असा काही अर्थ आहे असे मला वाटत नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR