गंगाखेड : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी आणि प्रेयसीकडून होणा-या पैशांच्या सततच्या मागणीला कंटाळून धिरज जगलपुरे या तरुण व्यावसायिकाने कारचा अपघात घडवून आणत आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात मृत धिरजची प्रेयसी आणि एका व्हिडिओ निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील संत जनाबाई नगर भागातील रहिवासी धिरज जगलपुरे हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून एका तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. तसे लेखी प्रतिज्ञापत्रही दोघांनी केले होते. मात्र, काही काळाने त्यांच्यात पैशांवरून वाद सुरू झाले. प्रेयसीच्या सततच्या पैशांच्या मागणीमुळे धिरज मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला होता. पैशांसाठी प्रेयसीने धिरजच्या दुकानात जाऊन गोंधळ घातला, स्वत:ला इजा करून घेतली आणि धिरजविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती.
या प्रकरणातील दुसरा आरोपी अशरफ पठाण याने धिरजच्या प्रेयसीची मुलाखत घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने धिरजकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने अशरफने तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला, ज्यामुळे धिरजची समाजात मोठी बदनामी झाली.
बदनामी आणि आर्थिक ओझ्यामुळे धिरज प्रचंड मानसिक तणावाखाली होता. समाजात बदनामी झाल्याने आता मला जगण्याची इच्छा नाही, असे त्याने आपल्या मित्रांजवळ बोलून दाखवले होते. अखेर २ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याने राष्ट्रीय महामार्गावर स्वत:च्या क्रेटा कारचा भीषण अपघात घडवून आणत आत्महत्या केली.
याप्रकरणी धिरजचा भाऊ सुरज जगलपुरे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आहेत. धिरजच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल त्याची प्रेयसी आणि अशरफ पठाण या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

