मंदिर समिती अध्यक्षांचा खाजगी सचिव निलंबित
बद्रीनाथ : वृत्तसंस्था
अयोध्येच्या राम मंदिरातील देणगीची चोरी करण्यात आल्याची बातमी गाजत असतानाच आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवरही डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. भारतातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने थेट मंदिर समितीच्या अध्यक्षांच्या कार्यालयातील खासगी सचिव प्रमोद नौटियालला तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित केले.
प्रमोद नौटियाल यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून चढावा आणि आर्थिक व्यवहारात गंभीर अनियमितता केल्याचा प्राथमिक आरोप ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे मंदिर प्रशासनाशी संबंधित इतर कर्मचारी आणि अधिका-यांचे धाबे दणाणले. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार खासगी सचिव प्रमोद नौटियाल याच्याविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याचे आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ३ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी मंदिर समितीने तातडीने चार सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली होती.
निलंबनाच्या काळात त्याला बीकेटीसीचे मुख्य कार्यालय, ज्योतिर्मठ (जिल्हा चमोली) येथे संलग्न करण्यात आले आहे. मंदिर समितीने स्पष्ट केले आहे की, देवस्थान प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य असून कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा चोरी खपवून घेतली जाणार नाही आणि नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
प्राथमिक अहवालात
प्रथमदर्शनी आरोप सिद्ध
समितीच्या प्राथमिक अहवालाचे आणि प्रमोद नौटियाल यांनी सादर केलेल्या स्पष्टीकरणाचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. यामध्ये नौटियालवर असलेले भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहेत. या अहवालात कर्मचा-याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यावरून निलंबनाची कारवाई केली.
















