वाढत्या किमतीनंतर केंद्राचे पाऊल, शेतकरी संतप्त
नाशिक : प्रतिनिधी
कांद्याच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक येथील बफर स्टॉकमधील कांदा रेल्वेच्या विशेष रेकद्वारे देशातील दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये पाठवणार आहे. कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून पाठवला जाणारा हा विशेष रॅक लासलगाव रेल्वे स्थानकातून रवाना होत आहे. नाफेड व एनसीसीएफ या संस्थेच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या १.२१ लाख मेट्रिक टन बफर स्टॉकमधील ८४० मॅट्रिक टन कांदा दिल्लीला पाठवला जाणार आहे.
नाफेड आणि एनसीसीएफ या सारख्या संस्थांमार्फत किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते आणि दर वाढल्यास नियोजनबद्ध पद्धतीने बाजारात हा साठा उतरवत कांद्याचे भाव कमी केले जातात. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये शेतक-यांच्या कांदा मालाला सध्या ३५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असताना नाफेड, एनसीसीएफने खरेदी केलेल्या बफर स्टॉक मधील हा कांदा देशातील प्रमुख शहरांमध्ये उतरवल्यास त्याचा थेट फटका येथील कांदा भावावर होऊ शकतो, अशी भीती शेतकरी व व्यापा-यांना आहे.
बफर स्टॉक आता बाजारात उतरविला असून, प्रारंभी कांद्याची अधिक मागणी असणा-या ५ मोठ्या शहरांत पाठवला जाईल, अशी माहिती आहे. यामध्ये नवी दिल्ली, चेन्नई, मदुराई, एर्नाकुलम अथवा कोची आणि गुवाहाटी या शहरांत हा कांदा ३५ रुपये किलोने विकला जाणार आहे. नाशिकमध्ये कांदा एक्स्प्रेसमध्ये कांदा भरण्यात येत असून ही एक्स्प्रेस दिल्लीला जाणार आहे.
वाढत्या किमतीमुळे बफर
स्टॉकचा कांदा बाजारात
चेन्नईत कांद्याचा दर ५५ ते ६५ रुपयांवर पोहोचला आहे. कोलकाता येथे कांद्याचा दर ५३ रुपये किलो आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील सणांच्या काळात आणि हवामानामुळे निर्माण होणा-या अडचणींमुळे कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या १.२१ लाख टन बफर स्टॉक कांद्यापैकी काही कांदा बाजारात आणला जात आहे
शेतक-यांनी दिला
आंदोलनाचा इशारा
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला ३५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र, केंद्र सरकार कांद्याचे भाव पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला. नाफेड व एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा आम्ही दिल्लीत जाऊ देणार नाही, असा इशारा शेतक-यांनी दिला. केंद्र सरकार ग्राहकहित बघत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला.
















