दाहोद : गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शाळेतील मुख्याध्यापकांनी पहिलीच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा गळा दाबून हत्या केली आहे. मुख्याध्यापक या सहा वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी या चिमुकलीने विरोध केल्यामुळे मुख्याध्यापकांनी तिचा खून केला आणि तिचा मृतदेह शाळेच्या आवारात फेकून दिला. या घटनेमुळे दाहोदमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ५५ वर्षीय मुख्याध्य्यापक गोविंद नट या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.तर आरोपी मुख्याध्यापक हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटवर्तीय असल्याचा दावा गुजरात काँग्रेसने केला आहे. गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते पार्थिवराज काठवाडिया यांनी काही छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात आरोपी राज्याचे माजी मंत्री अर्जुन सिंग चौहान यांच्यासोबत बसलेला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पोशाखात एका कार्यक्रमात सहभागी झालेला दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपच्या राजवटीत आमच्या मुली सुरक्षित नाहीत, हे अशा घटनांवरून स्पष्ट होते. या घटना शिक्षण क्षेत्रावर कलंक आहेत आणि पालक चिंतेत आहेत, असेही काठवाडिया म्हणाले.
वरिष्ठ पोलिस अधिकारी राजदीप सिंग झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ६ वर्षांच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी शाळेच्या आवारात सापडला होता. मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील कारवाई सुरू आहे, असेही सिंग म्हणाले.