नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्याच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. बांगलादेशातील हिंसाचार, अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि भारतासोबत बिघडलेले संबंध याला युनूस सरकारच जबाबदार असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे.
आगामी निवडणुकांवर भाष्य करताना हसीना यांनी इशारा दिला की, अवामी लीगला डावलून होणारी निवडणूक ही मुक्त आणि न्याय्य नसून ती केवळ राज्याभिषेक असेल. ज्या पक्षाला जनतेने नऊ वेळा जनादेश दिला, त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी आहे. अवामी लीग नसेल, तर लाखो नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतील, ज्यामुळे नवीन सरकारची नैतिक वैधता संपेल, असेही त्यांनी नमूद केले.
शेख हसीना यांनी कठीण काळात आश्रय आणि सन्मान दिल्याबद्दल भारत सरकार आणि येथील सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले. मी देश सोडला कारण मला आणखी रक्तपात पाहायचा नव्हता, पण मी न्यायाला सामोरे जाण्यास घाबरत नाही. जेव्हा बांगलादेशात पुन्हा कायद्याचे राज्य येईल, तेव्हाच मी परत जाईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्याविरुद्ध न्यायालयात होणा-या कारवायांना हसीना यांनी राजकीय कट असल्याचे म्हटले आहे. त्यांना स्वत:ची बाजू मांडण्याची किंवा वकील निवडण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या प्रत्यार्पणाची मागणी युनूस प्रशासनाच्या हताशपणातून येत आहे, असे त्या म्हणाल्या.

