ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेशची राजधानी ढाका येथे सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जाळपोळ आणि हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे समर्थक ढाकासह पाच जिल्ह्यांमध्ये निदर्शने करीत असून महामार्ग रोखले आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने शहरात बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या १२ अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत, ज्या सतत गस्त घालत आहेत. यापूर्वी, बांगलादेश सरकारने परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची अराजकता रोखण्यासाठी ढाका आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये १४ बीजीबी युनिट्स तैनात केल्या होत्या.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे समर्थक आता अधिकाधिक आक्रमक होत आहेत. त्यांच्याविरुद्धचे खोटे खटले मागे घ्यावेत आणि फेब्रुवारीमध्ये निवडणुकीची तारीख जाहीर करावी अशी त्यांची मागणी आहे. शुक्रवारी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी चकमक झाली. बीजीबी मुख्यालयाच्या म्हणण्यानुसार, राजधानीच्या प्रमुख भागात निमलष्करी दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे, जिथे अलिकडच्या काळात जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत.
१३ नोव्हेंबर रोजी हसीना यांच्याविरुद्धच्या निकालापूर्वी अवामी लीगने देशभरात निदर्शने केल्यानंतर शुक्रवारी पहाटे ढाक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन बॉम्बस्फोट झाले.

