आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा दरारा कायम
दुबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सेमिफायनलमध्ये बांगला देशचा धुव्वा उडवित फायनलमध्ये धडक मारली. फलंदाजीत शफाली वर्माच्या धमाकेदार खेळीनंतर गोलंदाजीत दीप्ती शर्माने कमालीची कामगिरी करीत बांगला देशच्या फलंदाजांची भंबेरी उडविली. या विजयासह भारतीय संघाने सलग १० व्या हंगामात फायनल गाठत आशिया कप स्पर्धेतील आपला दरारा कायम राखला. आता १३ सप्टेंबर रोजी टीम इंडिया आठवे जेतेपद मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
दुबईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सेमिफायनलमध्ये नाणेफेक जिंकून बांगला देशच्या संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शफाली वर्माच्या ६४ धावांच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकांत १५० धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगला देशचा संघ ७ विकेट गमावून १०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे भारतीय संघाने ४० धावांसह मोठा विजय नोंदवत फायनलचे तिकीट पक्के केले.
















