लातूर : प्रतिनिधी
समाज परिवर्तनाच्या चळवळीला आयुष्य अर्पण करणारे आणि बाबा आमटे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी लातूरमध्ये नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे हे भूषविणार आहेत.
रविवार, दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्व. दगडोजीराव देशमुख सभागृह, मार्केट यार्ड येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. माधव बावगे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक जागृती, ग्रामीण विकास आणि जनजागरण या क्षेत्रांत दीर्घकाळ सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरिक संघटनांनी एकत्र येत त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. प्रमुख पाहूण्यांच्या उपस्थितीत प्रा. जयदेव डोळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी बावगे यांचाही यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख पाहुण्यांमध्ये लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे आणि ‘नॅचरल शुगर’चे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांचा समावेश आहे. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार (संपादक, विचारशलाका), महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, सौंदळाचे सरपंच शरद आरगडे आणि बरूरे हॉस्पिटलचे संचालक डॉ. राम बरूरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन माधव बावगे नागरी सत्कार समिती, लातूर यांच्या वतीने करण्यात आले असून, प्रा. सुभाष भिंगे (अध्यक्ष) आणि शाम जैन (सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. समितीच्या वतीने लातूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

