लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात हरभ-याला हमीभावापेक्षा ३०० ते ४०० दर कमी मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळले. शेतक-यांनी २३ हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केल्यानंतर ज्या शेतक-यांना हरभरा विक्रीसाठी एसएमएस पाठवले. ते शेतकरी शेतमाल विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊ लागले. मात्र हमीभाव खरेदी केंद्रावरील बारदाना संपल्याने गेल्या आठ दिवसापासून हरभ-याची खरेदी ठप्प झाली आहे.
जिल्हयात ३ लाख ३८ हजार ५८६ हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आसून यात २ लाख ८२ हजार ८५८ हेक्टरवर हरभरा या पिकांचा पेरा झाला आहे. कांही ठिकाणी हरभरा या पिक परीपक्कव झाल्याने त्याची काढणी होऊन ते आडत बाजारात शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत. शासनाने ५ हजार ८७५ रूपये हरभरा या पिकाला हमीभाव जाहिर केला आहे. मात्र आडत बाजारात हरभरा या पिकाला सरासरी ५ हजार ४५० रूपये दर मिळत आहे. आडत बाजारात शेतक-यांना क्विंटल मागे ३०० ते ४०० रूपयांचा फटका बसत आहे. ही बाब लक्षात घेता शेतकरी हरभरा हमीभाव खरेदी केंद्राकडे वळाले आहेत. आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत २३ हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रावर दि. १ ते ३१ मार्च कालावधीत ५ हजार २५५ शेतक-यांनी ऑनलाईन हरभरा पिकाची नोंदणी केली आहे. त्यापैकी हरभरा खरेदीसाठी ४ हजार ४३५ शेतक-यांना एसएमएसही पाठवण्यात आले.
त्यानुसार आज पर्यंत २ हजार १०७ शेतक-यांचा २९ कोटी १० लाख ५८ हजार ६६३ रूपयांचा ४९ हजार ५४१ क्ंिवटल हरभरा खरेदी केला आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून या हमीभाव खरेदी केंद्रावरील बारदाना संपल्याने हरभ-याची खरेदी ठप्प आहे. त्यामुळे शेतक-यांची हमीभाव केंद्रावर नोंदणी करूनही अडचण झाली आहे.
४ ते ५ दिवसांत बारदाना येईल
जिल्ह्यात नाफेडच्याकडून हरभरा खरेदीसाठी २३ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर १ ते ३१ मार्च या कालावधीत शेतक-यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी करून हरभरा विक्रीसाठीही आणला. मात्र या केंद्रावरील बारदाना संपल्याने हरभरा खरेदी ठप्प आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडे हरभरा खरेदी सुरू होण्याच्या पूर्वीपासून बारदाण्याची मागणी करत आहोत. मात्र बारदाना आजून मिळाला नाही. जिल्हयात बारदाना शिल्लक नसल्याने हरभरा खरेदी ठप्प होत आहे. आम्ही राज्य पणन मंडळाला बारदाना संपल्याचे कळवत आहोत. त्यानुसार येत्या ४ ते ५ दिवसात बारदाना येईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी मनोज वाजपेयी यांनी दिली.

