पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ अपघातात मृत्यू झाल्याची बातमी राज्यभरात वा-यासारखी पसरली. दादा गेले ही बाब बारामतीकरांना समजताच संपूर्ण बारामती शोकसागरात बुडाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. या बातमीमुळे महाराष्ट्राच्या विविध कानाकोप-यातून असंख्य कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांनी बारामतीकडे धाव घेतली. शहरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अजित पवार आपल्यात नाहीत ही बाब मान्य करायलाच बारामतीकर तयार नव्हते. दादांप्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून संपूर्ण बारामती बंद ठेवण्यात आले होते.
‘बंद’मुळे बाहेरून आलेल्या नागरिकांचे खाण्यापिण्याचे तसेच राहण्याचे मोठे हाल होत असल्याचे चित्र बुधवारी दिवसभर दिसून आले. अनेकजण रात्री उशिरापर्यंत शहरात अडकून पडले होते. अशा परिस्थितीत बारामतीतील व्यावसायिकांनी सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवले. काही हॉटेल चालक मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी कोणताही व्यावसायिक विचार न करता रात्री मोफत जेवणाची व्यवस्था केली. यासोबतच आपल्या हॉटेलच्या परिसरात तसेच खोल्यांमध्ये मोफत राहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली.
आज पैशांपेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे अशी भावना व्यक्त करत या हॉटेल व्यावसायिकांनी आलेल्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस केली. अनेक कार्यकर्त्यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अन्न, पाणी आणि निवा-याची व्यवस्था झाल्याने तणावपूर्ण वातावरणातही दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार म्हणजे आमचे सर्वस्व आहे असे म्हणत बारामतीकरांनी दाखवलेली ही एकजूट आणि सामाजिक जाणीव कौतुकास्पद ठरली. कठीण प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी बारामतीची ओळख असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

