26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रबिटकॉईन घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

बिटकॉईन घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नाव असलेल्या व्यक्तीच्या घरावर धाड

मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रात आज विधानसभेचे मतदान पार पडत असताना बिटकॉईन घोटाळा समोर आला आहे. पुण्यातील माजी पोलिस अधिकारी रवींद्र पाटील यांनी निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉईनचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपाचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन कॉल रेकॉर्डिंग्ज व व्हॉट्सऍप चॅट्सचे स्क्रीनशॉट प्रसिद्ध केले होते.

दरम्यान, ऐन निवडणुकीच्या काळात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लिपही समोर आली होती. आता या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ज्या गौरव मेहताचा उल्लेख झाला. त्याच्या रायपूरमधील घरी ईडीने धाड टाकली आहे. २०१८ साली झालेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणाचा तपास करण्यासाठी धाड टाकल्याचे सांगण्यात आले.

माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात गौरव मेहता हा प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते. गौरव मेहता हा एका ऑडिट फर्मचा कन्सल्टन्ट असून पुणे पोलिस ६,६०० कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. रवींद्र पाटील यांनी दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव मेहताला फोन करून क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील रक्कम निवडणुकीच्या कामासाठी मागितली होती.

रवींद्र पाटील यांनी आरोप केला की, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी २०१८ च्या बिटकॉईन घोटाळ्याचा गैरवापर केला असून या घोटाळ्यातील पैशांचा वापर महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी केला.

सुप्रिया सुळेंनी आरोप फेटाळले
एकतर काल संध्याकाळी मला माध्यमांमधून कळले की असे आरोप झाले आहेत. माझ्या हातात ते व्हॉईस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. मी त्यांना सांगितले की काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे की या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR