अहिल्यानगर : प्रतिनिधी
जामनेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचे आणखी ९ उमेदवारही बिनविरोध निवडून आले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (दि. २१) जामनेर नगर परिषद क्षेत्रातील ९ जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या या प्रक्रियेत भाजपकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आल्याचा विरोधकांचा दावा आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेले, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती.
बिनविरोधसाठी एवढा अट्टाहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा.’ दरम्यान, जामनेर नगर परिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी साधना गिरीश महाजन या बिनविरोध विजयी झाल्या. तर भाजपाचे ९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर आता नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दडपशाहीने लोकशाहीची हत्या
दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणा-या, लोकशाहीला घातक असणा-या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश द्यावा. गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन, नेत्यांच्या कुटुंबियांना नगर परिषदांचे इनाम. भाजपची बिनविरोध कुटुंब कल्याण योजना,असे म्हणत गिरीश महाजन यांच्यावर रोहित पवार यांनी टीका केली.

