नितीश कुमार राज्यसभेवर, ११ जागांसाठी निवडणूक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यसभेच्या १० राज्यांमधील ३७ जागांपैकी २६ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या असून, हरियाणा, बिहार आणि ओडिशामधील ११ जागांसाठी आज मतदान झाले. त्यानंतर निकालही जाहीर झाला असून, बिहारमधील सर्व पाचही राज्यसभेच्या जागांवर एनडीएने विजय मिळवल. या विजयासह मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप अध्यक्ष नितीन नबीन राज्यसभेत पोहोचले आहेत. ओडिशात क्रॉस व्होटिंगमुळे भाजपचाच फायदा झाला तर हरियाणात क्रॉस व्होटिंगमुळे वाद निर्माण झाल्याने हा वाद आता निवडणूक आयोगात गेला आहे.
बिहारमध्ये राज्यसभेच्या ५ जागांसाठी निवडणूक झाली. पाचही जागांवर एनडीएचे उमेदवार रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह, शिवेश राम, नितीश कुमार, नितीन नवीन हे पाच जण विजयी झाले. बिहार निवडणुकीत काँग्रेसचे तीन आमदार आणि राजदचा एक आमदार गैरहजर राहिला. त्यामुळे विरोधी उमेदवार अमरेंद्रसिंह धारी यांचा पराभव झाला. यामुळे बिहारमध्ये महाआघाडीला धक्का बसला.
१० राज्यांमधील ३७ पैकी ११ राज्यसभेच्या जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. २६ जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले. त्यापैकी १३ जागांवर एनडीए आणि १३ जागांवर विरोधी पक्षाचे सदस्य निवडून आले. त्यामुळे आज ११ जागांसाठी मतदान पार पडले.ओडिशात उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. येथे बीजेडीला अंतर्गत बंडाळीचा फटका बसला. बीजेडीचे ८ आणि कॉंग्रेसच्या ३ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली. त्याचा फटका विरोधी पक्षाला बसला. ओडिशा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास यांनी कबूल केले की, काँग्रेसचे आमदार दशरथी गमांग, सोफिया फिरदौस आणि रमेश जेना यांनी पक्षाच्या विरोधात मतदान केले.
यासोबतच हरियाणात काँग्रेसच्या २ मतांवर आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली. भाजपचे गौरव गौतम आणि किशन बेदी यांनी या दोन मतांवर आक्षेप घेतला. हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. निवडणुकीआधी इंडिया आघाडीकडे ३७ पैकी २५ जागा तर एनडीएकडे १२ जागा होत्या. आता निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे.

