पराभवाच्या कारणांचा आढावा, २ आठवड्यांत पुरावे मांडणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाने आज दिल्लीत पहिली आढावा बैठक घेतली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, ज्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि अजय माकन उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी निवडणूक निकालाचा आढावा घेतला. संघटनात्मक त्रुटींवर चर्चा केली आणि भविष्यातील रणनीतीसाठी सूचना दिल्या. सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष आता बिहारमध्ये इतक्या मोठ्या पराभवामागील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर निवडणूक हेराफेरीचा आरोप केला.
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्ष अनियमिततेचे पुरावे गोळा करत आहे आणि ते दोन आठवड्यांत देशासमोर सादर करेल. काँग्रेसने या निवडणुकीत ६१ जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांना फक्त ६ जागांवर विजय मिळाला. पक्षाच्या मतांचा वाटा ८.७१ टक्क्यांपर्यंत घसरला. २०२० मध्ये ७० जागांवर लढून १९ जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना ९.६ टक्के मते मिळाली होती. अजय माकन म्हणाले की, अनेक ठिकाणी अनियमितता होत्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट घेतल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बिहार निवडणूक निकालाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यासंदर्भात सध्या माहिती घेतली जात आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर ब-याच बाबी समोर येतील.
निकाल अनपेक्षितच
बिहार निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे हे निकाल आश्चर्यकारक आहेत. १९८४ मध्येही काँग्रेसने यावेळी भाजपने मिळवलेला स्ट्राइक रेट गाठला नाही. काही तरी चूक आहे. आमचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी सतत अनियमितता नोंदवत आहेत. माकन म्हणाले की, सर्व आघाडी पक्ष या निकालाला अनपेक्षित मानतात आणि चौकशीची मागणी करत आहेत.
तिकीट वाटपापासून
प्रचारापर्यंत मतभेद
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मतदार हक्क यात्रेसोबत महाआघाडीला एकत्रितपणे सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेजस्वी यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केल्याने त्यांच्यात फूट पडली. नंतर काँग्रेसनेही तेजस्वी यांना मुख्यमंत्री चेहरा बनवण्यास सहमती दर्शविली. परंतु तोपर्यंत, राजद आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचा संदेश पसरला होता. प्रचारापासून ते तिकीट वाटपापर्यंत सर्व गोष्टींमध्ये काही अंशी गोंधळाची स्थिती दिसून आली.

