पाटणा : वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतिकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किशोर यांनी म्हटले की, जर मी स्वत: निवडणूक लढलो, तर पक्षाकडे लक्ष देता येणार नाही.
प्रशांत किशोर म्हणाले, मी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे पक्षानेच ठरवले आहे. त्यामुळेच राघोपुर मतदारसंघातून तेजस्वी यादवांविरोधात दुसरा उमेदवार देणार आहोत. हा निर्णय पक्षाच्या एकूण फायद्यासाठी घेतला आहे. जर मी निवडणूक लढलो असतो, तर माझे लक्ष संघटन आणि तयारीपासून विचलित होईल.
पीके पुढे म्हणाले, जर जन सुराज पक्षाला १५० पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर मी त्याला पराभव समजेल. मी आधीच सांगितले आहे की, आम्हाला १० पेक्षा कमी किंवा १५० पेक्षा जास्त जागा मिळतील. आधे-मधे काही शक्यता नाही. जर आम्हाला १२० किंवा १३० जागा मिळाल्या तरी ते आमच्यासाठी पराभवच असेल. जन सुराज पक्ष बिहार निवडणुकीत यशस्वी झाला, तर त्याचा परिणाम केवळ बिहारपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो देशाच्या राजकारणाच्या दिशाही बदलेल.

