बुद्धिबळाची नवी राणी दिव्या!

- Advertisement -

नागपूरच्या दिव्या देशमुखने सोमवारी वयाच्या १९व्या वर्षी बुद्धिबळातील नवी राणी बनण्याचा मान मिळवला. जॉर्जिया येथे झालेल्या महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने भारताच्याच कोनेरू हम्पीवर अंतिम फेरीत टायब्रेकरमध्ये मात केली. याबरोबरच दिव्याने सर्वांत युवा विश्वविजेती ठरण्याची किमया साधली. दिव्याच्या या कामगिरीवर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२१ पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३ मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही बुद्धिबळपटू उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचली नव्हती. दिव्या प्रथमच विश्वचषकात सहभागी झाली होती. ग्रँडमास्टर हा ‘नॉर्म’ मिळवण्यासाठी दिव्याला या स्पर्धेत छाप पाडणे गरजेचे होते. फिडे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे आयोजित जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये अपेक्षित गुण कमावण्यासह मानांकित खेळाडूंना पराभूत केले तरच ‘ग्रँडमास्टर’ हा नॉर्म मिळतो. दिव्याने या स्पर्धेत तिच्यापेक्षा जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानी असलेल्या खेळाडूंना नमवण्याचा पराक्रम केला.

त्यामुळेच ती ग्रँडमास्टर किताब मिळवणारी भारताची चौथी महिला ठरली. यापूर्वी हम्पी, द्रोणावली हरिका व आर. वैशाली यांनी अशी कामगिरी केली आहे. मुख्य म्हणजे हम्पीने २००२ मध्ये ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळवला, तेव्हा दिव्याचा जन्मही झाला नव्हता. २००५ मध्ये जन्मलेल्या दिव्याने कनिष्ठ गटात जागतिक स्पर्धा जिंकली. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याचे आई-वडील हे दोघेही डॉक्टर आहेत. आई नम्रता ही दिव्यासोबत प्रामुख्याने सर्व स्पर्धांसाठी जाते. विश्वचषक विजयानंतर दिव्याने सर्वप्रथम धावत येऊन आईला घट्ट मिठी मारली. हा क्षण खूपच भावनिक होता. शालेय वयापासूनच दिव्याला बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तम यश मिळवले. नंतर कनिष्ठ वयोगटातील स्पर्धांमध्येही तिने छाप पाडली.

२०२१ मध्ये तिने महिला ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळवला. २०२२ च्या चेस ऑलिम्पियाडमध्ये तिने कांस्यपदक मिळवले. त्याच वर्षी तिने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. २०२० मध्ये ऑनलाईन ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने जेतेपद मिळवले, त्यावेळी दिव्या त्या स्पर्धेचा भाग होती. २०२३ मध्ये दिव्याने आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टरचा नॉर्म मिळवला. २०२४ मध्ये भारताने ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी सुवर्ण जिंकले. त्यावेळी महिला संघाच्या विजयात दिव्याचे मोलाचे योगदान होते. त्याच वर्षी तिने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला. त्यामुळे जगभरात दिव्याचे नाव झाले. १०७ खेळाडूंसह यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. दिव्याला या स्पर्धेसाठी १५ वे मानांकन होते तर अंतिम फेरीतील भारतीय स्पर्धक हम्पीला चौथे मानांकन होते. दिव्याने पहिल्या दोन फे-यांमध्ये सहज विजय मिळवले. चौथ्या फेरीत तिच्यासमोर चीनच्या दुस-या मानांकित झू जायनरचे आव्हान होते. दिव्याने तिला नमवून सा-यांनाच धक्का दिला. उपान्त्यपूर्व फेरीत दिव्याने आपल्याच देशाच्या हरिकावर सहज मात केली. उपान्त्य फेरीत दिव्यासमोर चीनच्या तिस-या मानांकित टॅन झोंगाईचे कडवे आव्हान होते. कारण टॅनने जागतिक विजेतेपद मिळवले असून कँडिडेट्स स्पर्धाही जिंकली आहे.

दिव्याने तिलाही धूळ चारली. दुसरीकडे हम्पीनेसुद्धा उपान्त्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित ले टिंगेईला पराभूत केले. त्यामुळे प्रथमच भारताचे दोन बुद्धिबळपटू अंतिम फेरीत दाखल झाले. अंतिम फेरीत हम्पीचे पारडे जड होते. कारण तिच्याकडे इतक्या वर्षांचा अनुभव होता शिवाय ती कँडिडेट्स स्पर्धाही खेळली होती. परंतु दिव्याने आपल्या देहबोलीने हम्पीला दबावात आणले. दिव्या झटपट चाली रचत होती तर हम्पी विचारपूर्वक खेळत होती. पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर हम्पीला संधी होती. परंतु दिव्याने उत्तम बचाव केला. टायबे्रकरमध्ये दिव्याने संयम बाळगून हम्पीला चुका करण्यास भाग पाडले. मुख्य म्हणजे दिव्याकडे प्रत्येक चालीसाठी पुरेसा वेळ होता. कदाचित त्याचे हम्पीवर दडपण आले असावे. अखेर टायब्रेकरमध्ये हम्पी मागे पडली. तिने पुढील डावाचा विचार केला तर दिव्याने मात्र सुरू असलेल्या डावावर लक्ष केंद्रित केले. जणू काही तिला अर्जुनाप्रमाणे फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता! त्यामुळे पुढील डावात काय होईल याचा विचार न करता दिव्याने जे डोळ्यासमोर सुरू आहे त्यावर लक्ष देत सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. याचेच फलित म्हणजे हम्पीने हार मानली आणि दिव्याने बाजी मारली.

हम्पी मानसिकदृष्ट्या कणखर असली तरी दिव्याचा आत्मविश्वास व सकारात्मक देहबोलीसमोर ती डगमगताना दिसली. महिला विश्वचषकासह दिव्याने भारताची ८८ वी ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. अंतिम फेरीतील दोन्ही क्लासिकल डाव बरोबरीत सुटल्यानंतर दिव्याने टायब्रेकरद्वारे विश्वविजेतेपदाचा निकाल आपल्या बाजूने झुकवला. दिव्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या कामगिरीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. कोनेरू हम्पीनेसुद्धा संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. ‘दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा’ असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. कमी वयात ग्रँडमास्टर किताब आणि जागतिक अजिंक्यपद मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे. दिव्या ही नागपूरची शान आणि देशाचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे.

या विश्वविजयाबद्दल दिव्याला ५० हजार अमेरिकन डॉलर (सुमारे ४३ लाख रुपये)चे बक्षीस मिळाले आहे. या स्पर्धेत दिव्यासह भारताच्या ९ महिला बुद्धिबळपटूंचा तसेच जगभरातील ४६ वेगवेगळ्या बुद्धिबळ महासंघातील एकूण १०७ सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटूंचा सहभाग होता. विशेष म्हणजे जागतिक पातळीवरील टॉप २० पैकी १७ बुद्धिबळपटू या स्पर्धेत होते. त्यामुळे अवघ्या १९ वर्षांच्या दिव्याचे हे यश आणखीनच उजळून निघाले आहे. बुद्धिबळातील मानाचा ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी २५०० मानांकन (रेटिंग) आणि ग्रँडमास्टरचे तीन नॉर्म आवश्यक असतात. मात्र विश्वविजेतेपदामुळे तिला हा किताब थेट मिळाला. तिचे हे यश तिच्या दुर्दम्य जिद्दीचे आणि दृढतेचे प्रतीक आहे. बुद्धिबळ जगतात भारताचा तिरंगा डौलाने फडकविणा-या मराठमोळ्या दिव्या देशमुखचे मन:पूर्वक अभिनंदन!

- Advertisement -

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या वर्षी सोडलं जग

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45
Video thumbnail
Shivsena Protest|NEET पेपरफुटीवर शिवसेना आक्रमक;RCC क्लासेसवर शिवसेनेकडून शाहीफेक
03:33
Video thumbnail
Latur|पिक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक;विमा कंपनी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव
06:11