बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाण्यात भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडील आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरुन पळ काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील कवडगाव येथील गणेश जाधव हे आपल्या मोटार सायकलने हिरो पिंपळगावराजा येथून आपल्या घरी कवडगाव येथे जात होते. .त्यांच्यासोबत मोटार सायकलवर त्यांची पत्नी सपना गणेश जाधव (३०) आर्यन गणेश जाधव (१०), अरुण गणेश जाधव(४), रुद्र गणेश जाधव ( सात महिने) हे बसले होते. जाधव कुटुंब दुचाकीवरून भालेगाव बाजार मार्गे त्यांच्या घरी जात होते.
यादरम्यान कांदा व्यापारी रजा भाई यांच्या मळ्याजवळ एका भरधाव ट्रकने जाधव यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश यांच्या पत्नी आणि ३ मुलं गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यादरम्यान गणेश यांचा १० वर्षांच्या मुलाचा आर्यनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातामध्ये जखमी झालेल्या सपना जाधव, अरुण जाधव व रुद्र जाधव यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत.

