पुणे : औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने कारवाईला वेग दिला आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यातील औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांच्या तब्बल २ हजार ९०२ तपासण्या करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणा-या ८८० परवानाधारक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तसेच १०४ शोध व जप्तीच्या कारवायांमध्ये ११ कोटी ४१ लाख रुपयांचा बेकायदा औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला.
या कालावधीत औषध उत्पादन आस्थापनांच्या ६०७, तर विक्री आस्थापनांच्या २ हजार २९५ तपासण्या करण्यात आल्या. उत्पादन क्षेत्रातील १४० आणि विक्री क्षेत्रातील ७४०, अशा एकूण ८८० आस्थापनांवर नियामक कारवाई झाली. यामध्ये ६७७ परवाने निलंबित, तर २०३ परवाने रद्द करण्यात आले.
औषध उत्पादन आस्थापनांच्या तपासणीत सक्षम तांत्रिक कर्मचा-यांचा अभाव, मंजूर नसलेल्या कर्मचा-यांकडून बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्डमध्ये नोंदी करणे, गुणवत्ता नियंत्रण विभागात सक्षम तांत्रिक व्यक्तीच्या अनुपस्थितीत चाचण्या घेणे, अॅन्युअल प्रॉडक्ट क्वालिटी रिव् ू न करणे, स्टेरिलायझेशनच्या नोंदींमध्ये त्रुटी, व्हेंडर ऑडिटचा अभाव तसेच उत्पादन आणि अभिलेखांमध्ये तफावत अशा गंभीर त्रुटी आढळल्या. काही आस्थापनांमध्ये निकृष्ट दर्जाची औषधे तसेच परवान्यात मंजूर नसलेल्या औषधांचे उत्पादन होत असल्याचेही आढळून आले.
रक्तपेढ्यांमध्येही नियमभंग
रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांच्या तपासणीत नोंदणीकृत रक्त संक्रमण अधिकारी नसणे, रक्त संक्रमण आणि वितरणाच्या नोंदी अद्ययावत नसणे, रक्तपिशव्यांच्या साठ्याचा ताळमेळ न जुळणे, तापमान नियंत्रणातील त्रुटी, कालबा किंवा दूषित रक्तपिशव्यांची अयोग्य साठवणूक यांसारख्या त्रुटी निदर्शनास आल्या. याशिवाय रक्तघटकांची ट्रेसेबिलिटी आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातही नियमांचे उल्लंघन आढळले.
प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री
औषध विक्री केंद्रांच्या तपासणीत नोंदणीकृत फार्मासिस्टच्या प्रत्यक्ष देखरेखीशिवाय औषध विक्री, विना बिल व्यवहार, बिलावर बॅच क्रमांक आणि मुदत नोंदवून न देणे, शेड्यूल एच-१ औषधांची अपूर्ण नोंदवही ठेवणे, तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री होत असल्याचे आढळले.
















