लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील बेशिस्त वाहतूक पाहिली की, लातूर शहरात ज्याने वाहन चालवले तो, जगात कुठेही वाहन चालवू शकतो, अशी फुशारकी मारणा-या वाक्याला पुष्टी मिळते. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रयत्न अपुरे पडतायत हे लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांनी गेल्या २ महिन्यांखाली वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही दिवस वाहतुकीला शिस्त लागल्याचे दिसलेही परंतु, हे प्रयत्न थांबताच पुन्हा शहरातील वाहतुक जैसे थे झाली आहे. परिणामी शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
शहरात वाहतूक कोंडीची समस्या ही दररोजची डोकेदुखी बनली आहे. शहरातल्या मुख्य चौकात विशेषत: सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारक नियम धाब्यावर बसवून नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. मुख्य चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी अघोरी प्रयत्न करत चक्क रस्तेच बंद पाडलेत, मात्र वाहतूक पोलिसांचे काय? असा सवाल उपस्थित झाला असून नेमके वाहतूक पोलीस कुठे असतात आहेत काय करतात याचा आढावा आता पोलीस अधीक्षकांनी घेण्याची वेळ आली आहे.
शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्य शहरापासून १० ते १५ किलो मीटरपर्यंत नवनवीन वसत्या निर्माण होत आहे. साहजिकच वाहनांचीही संख्या तितक्याच पटीने वाढत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्य मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व सामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणून ऑटोरिक्षाकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांची प्रवासाची गरज वाढली त्या प्रमाणात ऑटोरिक्षांचीही संख्या वाढली आहे. शहरातील पीव्हीआर चौक ते गरुड चौक या जवळपास १५ किलो मीटरच्या अंतरात हजारो ऑटोरिक्षांची रेंगाळत चाललेली रांग वाहतुक कोंडीचे मुळ आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासोबतच बेशिस्त वाहतुकीची भर पडते. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचे बरेच प्रयत्न आजवर झाले आहेत. परंतु, वाहतुकीला शिस्त लागण्याऐवजी वाहतुकीची गुंतागुंत वाढतच चालली आहे.
















