अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष इस्लामाबादेत, इराणची अनुपस्थिती?
इस्रायल-लेबनॉन संघर्षामुळे इराणची नाराजी, व्हान्स यांचा इशारा
तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिका, इराण यांच्यात २ आठवडे शस्त्रसंधीवर एकमत झाल्यानंतर पाकिस्तान आणि इतर देशांच्या मध्यस्थीने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत अमेरिकेसह इराणच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे ठरले. त्यानुसार आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानात दाखल झाले असून, इराणने ही चर्चा गांभीर्याने घ्यावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. दरम्यान, इराणने पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कराराच्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच आहेत. लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी लागू होईपर्यंत वाटाघाटी होणार नाहीत, अशी भूमिका इराणने घेतली आहे. त्यामुळे बैठकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. त्यामुळे शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी होणा-या बैठकीकडे सा-या जगाचे लक्ष लागले आहे.
इस्लामाबाद येथील पंचतारांकित सेरेना हॉटेलमध्ये ही बैठक होत असून, या बैठकीसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बैठकीसाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ इस्लामाबादसाठी तातडीने रवाना झाले असून, ही बैठक ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करीत आम्ही या चर्चेकडे सकारात्मक दृष्टीने पाहात आहोत, असे म्हटले आहे. दरम्यान, इराणी माध्यम फर्स न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी लागू होईपर्यंत वाटाघाटी करणार नाही, असे इराणने म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकन वेबसाइट वॉल स्ट्रीट जर्नलने संसद अध्यक्ष गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अराघची यांच्यासह एक इराणी शिष्टमंडळ गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानात दाखल झाल्याचे वृत्त दिले. तथापि, फर्स न्यूजने हे वृत्त फेटाळले.
यापूर्वी ७ एप्रिल रोजी अमेरिका आणि इराण दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर सहमत झाले होते. दोन्ही देशांचे नेते बैठकीसाठी पाकिस्तानात भेटतील, असेही ठरले होते. ही चर्चा शनिवारी इस्लामाबादमध्ये होणार आहे. यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ आज इस्लामाबादमध्ये दाखल झाले. इस्लामाबादमध्ये पंचतारांकित सेरेना हॉटेलमध्ये दोन्ही देशांच्या विशेष दुतांची चर्चा होणार आहे. दरम्यान, या चर्चेत लेबनॉन हा कळीचा मुद्दा असेल. इस्त्रायलच्या मानवी कत्तली सुरुच असल्याने आणि लेबनॉन युद्धविरामाचा भाग नसल्याचा दावा इस्त्रायल आणि अमेरिकेकडून केला जात असल्याने या चर्चेमध्ये तोडगा कसा काढला जाईल, याकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे.
या चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये अत्यंत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून लॉकडाऊन लागल्यासारखी स्थिती आहे. दोन दिवस सुटी देण्यात आली आहे, जेणेकरून या अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेचा कुठलाही परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी लेबनॉनवर इस्रायली हल्ले म्हणजे युद्धविरामचे उल्लंघन आहे. अशा स्थितीत शांतता चर्चा निरुपयोगी आहे, असे म्हटले. त्यामुळे बैठक निष्फळ ठरल्यास काय होणार, याची चिंता भेडसावत आहे.
इस्लामाबादमध्ये
कडकोट बंदोबस्त
पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील हॉटेल सेरेना परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, हॉटेलचे पूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेतले आहे. ते एका हाय-सिक्युरिटी डिप्लोमॅटिक झोनमध्ये रूपांतरित केले आहे. विशेष म्हणजे ९ एप्रिलपासूनच हॉटेलमधील सर्व पाहुण्यांना इतरत्र हलविण्यात आले असून रविवारपर्यंत हे हॉटेल केवळ या शिष्टमंडळांसाठी राखीव असेल, असे सांगण्यात आले.
अमेरिका, इराणमध्ये
या मुद्यावर होणार चर्चा
अमेरिकेच्या मते इराणमध्ये कोणतेही संवर्धन होणार नाही. इराणने आपले सर्व उच्च-स्तरीय संवर्धित युरेनियम काढून टाकावे आणि आपल्या अणुसुविधा बंद कराव्यात किंवा मर्यादित कराव्यात. यासोबतच जगातील बहुतांश तेल आणि वायू होर्मुझ सामुद्रधुनीतून जातो. यावर इराणला नियंत्रण ठेवायचे आहे आणि ते टोल (शुल्क) आकारण्याबद्दल बोलत आहे. दरम्यान, अमेरिकेला हा मार्ग कोणत्याही अडथळ््यांशिवाय किंवा शुल्काशिवाय पूर्णपणे खुला आणि सुरक्षित हवा आहे. तसेच अमेरिकेला इराणच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर बंदी हवी आहे. तसेच इराणला सर्व अमेरिकी आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध तात्काळ हटवायचे आहेत. प्रामुख्याने या बैठकीत या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

