फुकेत : वृत्तसंस्था
अहमदाबादेतील विमान अपघातानंतर आता आज (दि. १३) एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणा-या एअर इंडियाचे विमान एआय ३७९ ला धमकी मिळताच विमानाची परत थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने विमानातील सर्व १५६ प्रवासी सुरक्षित आहेत. धमकी देणा-या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता फुकेत बेटावरुन दिल्लीला येणा-या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. एका क्रू मेंबरला विमानातील टॉयलेटजवळ बॉम्बच्या धमकीची चिठ्ठी आढळली. यानंतर तात्काळ विमानाला परत फुकेतच्या दिशेने वळवण्यात आले. लँडिंगनंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. सध्या विमानाची कसून तपासणी केली जात आहे.
युद्धामुळे विमान परतले…
इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतातून उड्डाण घेणारी अनेक विमाने वळवण्यात आली आहेत. मुंबईहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमानही अर्ध्यातून माघारी बोलवण्यात आले.