मुंबई: : सध्या संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा ही सत्ताधा-यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागली आहे. हे काही चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. अशाप्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत, असा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. राज ठाकरे यांनी गुरुवारी दादरमधील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मतदान प्रक्रियेत बोटावर वापरल्या जाणा-या शाई पुसल्या जात असल्यावरून निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
सध्या निवडणुकीबाबत कशाप्रकारची यंत्रणा सुरु आहे, हे आपण सगळे बघत आहोत. येन केन प्रकारेन निवडणुका जिंकायच्या हे सत्ताधा-यांनी ठरवले आहे. आम्ही दुबार मतदारांचा मुद्दा समोर आणला तेव्हा निवडणूक आयोगाने आमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. दुबार मतदारांनंतर आम्ही व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला. व्हीव्हीपॅट मशीन नसल्याने आपण दिलेले मतदान आपल्याच उमेदवाराला गेले आहे की नाही, हे कळत नाही. या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाने पाडू यंत्र आणले. हे पाडू यंत्र मतमोजणीवेळी वापरले जाणार आहे. सरकारने ठरवलेच आहे, विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लकच ठेवायची नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
निवडणूक आयोगाने पाडू यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवले नाही. निवडणूक आयोग याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देत नाही. यापूर्वी मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावली जायची. पण आता मार्करने मतदारांच्या बोटावर खूण केली जात आहे. मार्करने लावलेली शाई सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर पुसली जात आहे. याशिवाय, निवडणूक आयोगाने प्रचाराची मुदत संपल्यानंतर राजकीय पक्षाच्या उमेदवारांना शेवटच्या दिवशीही घरात जाऊन मतदारांना भेटण्याची मुभा दिली.
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पैसे वाटण्यासाठी ही मुभा देण्यात आली. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी अशाप्रकारे कामाला लागले आहे. आम्ही हे सगळे रोखण्यासाठी काम करत आहोत. पण या सगळ्या गोष्टी चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. अशाप्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
सकाळी दादरच्या छबिलदास येथील मतदान केंद्रावर दुबार मतदार पकडला गेला. त्यामुळे आज दिवसभर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी सतर्क राहून यावर लक्ष ठेवावे. सत्तेच्या गैरवापरला मर्यादा असायला पाहिजेत. भाजपचे नेते विकासाची भाषा करत आहेत. पण शाई पुसून पुन्हा मतदानाला जायचे, याला विकास म्हणायचे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

