बोरी : येथील जिंतूर- परभणी महामार्गलगत असलेली ३ किराणा दुकाने व १ कृषी केंद्र अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडली. चोरट्यांनी चारही दुकानांचे कुलूप व शटर तोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, बीट जमादार राजेश जटाळ, शेख वसीम, वाहन चालक शेख मोबीन यांच्यासह सहका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परभणी येथून ठसे पथक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने चोरी झालेल्या दुकानापासून परभणी रोडवरील पोलीस वसाहतीकडे फिरत होते. या घटनेमुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान बोरी पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर-परभणी महामार्ग लगत असलेले स्वराज कृषी केंद्र, महादेव किराणा, भाग्यवंत किराणा, घोलप किराणा ही चार दुकाने शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केली. दुकानांचे कुलूप व शटर तोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली. स्वराज कृषी केंद्राचे मालक गोपाळ यशवंतराव माने यांनी बोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दुकान गल्ल्यातील ५ हजार रूपये होते. याशिवाय महादेव किराणा ५ हजार रुपये, भाग्यवंत किराणा १५ हजार रुपये, घोलप किराणा १५ हजार रुपये असा एकुण ४० हजारांच्या रोख रकमेवर चोर्यांनी डल्ला मारला आहे. महामार्ग लगतची दुकाने फोडल्याने बोरीतील व्यापारी व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
















