मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणावतने ‘जेन झी’ ला गटारछाप म्हटल्याने वाद निर्माण झाला असून तिच्यावर टीका होत आहे. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने तिला प्रत्युत्तर दिले असून तिच्यापेक्षा देशासाठी ‘जेन झी’ने दिलेले योगदान जास्त आहे असे म्हटले आहे. कंगनावर सीजेपी आणि विरोधकांकडून टीका होत असताना आता तिला भाजपा नेत्यानेच सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे असे भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
गिरीश महाजन यांनी कंगनाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अशी वक्तव्यं कोणीही करू नयेत. आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे. हा विषय गंभीर आहे. मोदींनी स्वत: या विषयात लक्ष घातले आहे. परीक्षा पद्धतीमध्ये बदल होत आहे. असे असताना आमदार, खासदार, मंत्री यांनी थोडे मापून बोलले पाहिजे .
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावर ते म्हणाले, या आंदोलनामध्ये जे खरंच विद्यार्थी आहेत त्यांचा विषय वेगळा आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे राजकीय फायदा कसा उचलता येईल या हेतूने काही राजकीय पक्षाचे लोक, गुंड या आंदोलनात मस्ती करत होते. पोलिसांनी या आंदोलनाशी संबंध नसलेले लोक देखील पकडले आहेत, अशा आंदोलकांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र खरंच जे विद्यार्थी या आंदोलनामध्ये उतरले होते त्यांच्या बाबतीत विचार केंद्र सरकार करत आहे. जे फक्त दंगामस्ती करायला, दगडफेक करायला आले होते, पोलिसांवर हल्ला केला, वाहनांची तोडफोड केली अशांना सोडण्याची आवश्यकता नाही .
















