मुंबई : प्रतिनिधी
मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात वडापाव, मिसळपाव, सँडविच किंवा ब्रेड-बटरने होते. मात्र, आता या खाद्यपदार्थांसाठी मुंबईकरांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. इंधन दरवाढ, दूध आणि सोन्या-चांदीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे जनता आधीच होरपळत होती, त्यातच आता मुंबईत ब्रेड आणि बेकरी उत्पादनांच्या किमतीत ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मध्यपूर्व आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता दैनंदिन आयुष्यावरही दिसू लागला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, सोने-चांदी आणि दुधाच्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांच्या नाश्त्यावरही महागाईचा फटका बसला आहे. मुंबईत ब्रेड आणि त्यासंबंधित उत्पादनांच्या किमतीत प्रति पॅकेट ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १६ मेपासून लागू करण्यात आली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोक सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड, पाव, सँडविच, वडापाव आणि इतर पदार्थांवर अवलंबून असतात, त्यामुळे या दरवाढीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ब्रेडच्या वाढल्या किमती
ब्रेडच्या किमतीत झालेल्या वाढीमागे अनेक कारणे समोर आली आहेत. अहवालानुसार, ब्रेड पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणा-या प्लास्टिक पावडरच्या वाढत्या किमती हे प्रमुख कारण मानले जात आहे. या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. मात्र, रुपयाच्या घसरत्या मूल्यामुळे आयात खर्च वाढला, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला, ब्रेडमध्ये वापरल्या जाणा-या प्रिझर्व्हेटिव्हजचे दर वाढले, तर उत्पादन खर्चातही वाढ झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून उत्पादकांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
















