भंडारा : प्रतिनिधी
बाल उत्सव शारदा मंडळाच्यावतीने महाप्रसाद बनविताना प्रेशर कुकरचा स्फोट झाला. यात १४ जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वॉर्ड येथे शनिवारी सायंकाळी घडली.
जखमींमध्ये परवेज शेख, आशिष गणवीर, भावेश खंगार, रितेश साठवणे, विकी गणवीर, साधना गणवीर, गीता अंबुलकर, ज्योती नन्हे, माया मारवाडे, चित मारवाडे आणि सविता साठवणे यांचा समावेश आहे.
मंडळातर्फे मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद तयार करण्यासाठी ४० लिटर क्षमतेच्या प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता. महाप्रसाद तयार झाल्यानंतर कुकर खोलण्याच्या प्रक्रियेत अचानक जोरदार स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज आणि धक्क्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

