भंडारा : प्रतिनिधी
शनिवारी (३ डिसेंबर) रात्री चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात एक थरारक घटना घडली. भाविकाची कार अनियंत्रित होऊन थेट तलावात कोसळली. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आणि एका स्थानिक तरुणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन दोघांचे प्राण वाचवले.
गोंदिया जिल्ह्यातील भजेपार येथील रहिवासी श्रीकृष्ण नथू रहांगडाले हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी चांदपूरला आले होते. दर्शन आटोपून परत जात असताना, पार्किंगमधून सॅन्ट्रो कार बाहेर काढत असताना हा अपघात झाला. कार वळवत असताना अचानक एक्सीलेटरवर पाय जोरात दाबला गेल्याने कारचा वेग वाढला आणि ती थेट समोरच्या तलावात जाऊन कोसळली. कार तलावात बुडत असल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
यावेळी गर्दी नियंत्रणासाठी तैनात असलेले सिहोरा पोलिस स्टेशनचे हवालदार सुनील कासदा, पोलिस शिपाई रवींद्र सव्वालाखे, साहिल कोहळे (वय १७)या तिघांनीही क्षणाचाही विलंब न लावता तलावात उड्या घेतल्या. पाण्याचा अंदाज घेत त्यांनी बुडत्या कारपर्यंत पोहत जाऊन चालक श्रीकृष्ण रहांगडाले आणि त्यांचा मुलगा ओम रहांगडाले यांना सुखरूप बाहेर काढले.

