लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग-एक संगीतमय वारी’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील दयानंद सभागृह येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे.
‘भक्तिरंग-एक संगीतमय वारी’ हा संतवाणी, अभंग आणि भक्तिसंगीताच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या भक्तिभावाचा अनुभव देणारा विशेष सांगीतिक कार्यक्रम आहे. विठ्ठलभक्ती, संतपरंपरा आणि वारकरी सांस्कृतिक परंपरेतील भक्तिरचनांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून साकारला जाणार आहे. भक्ती, संगीत आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा सुरेख संगम साधणारा हा कार्यक्रम लातूरकर रसिकांसाठी एक वेगळा आणि संस्मरणीय सांगीतिक अनुभव ठरणार आहे.
या कार्यक्रमात विठ्ठल जगताप, मधुवंती बोरगांवकर, शिवरुद्र स्वामी, लक्ष्मण श्रीमंगले आणि अनिरुद्ध वाघचौरे हे गायक कलाकार भक्तिगीते, अभंग आणि संतवाणीचे सादरीकरण करणार आहेत. संगीत संयोजन डॉ. राम बोरगांवकर यांचे असून, कार्यक्रमाचे निवेदन उद्धव फड करणार आहेत. कार्यक्रमात सतीश काळे आणि गणेश बोरगांवकर (तबला), सुरेश फडतरे (हार्मोनियम), विश्वनाथ स्वामी (तालवाद्य), पंकज शिरभाते (व्हायोलीन), प्रसन्न बराटे आणि तुकाराम आव्हाड (पखावज) हे कलाकार साथसंगत करणार आहेत. विविध वाद्यांच्या सुरेल साथीने भक्तिसंगीताचा हा सांगीतिक सोहळा अधिक रंगतदार होणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी तसेच पंढरपूरची वारी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संतपरंपरेतील संतांच्या अभंगवाणीने महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेला समृद्ध केले आहे. या समृद्ध संतपरंपरेचा आणि वारकरी सांस्कृतिक वारशाचा परिचय अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘भक्तिरंग-एक संगीतमय वारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, लातूर व परिसरातील वारकरी, विठ्ठलभक्त, संगीतप्रेमी, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसपूर्ण सांगीतिक वारीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
















