लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील खंडापूरच्या शिवारात सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्याने संपूर्ण मराठवाडा भक्तिमय झाला आहे. हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुर असलेल्या या सोहळ्यात भाविकांची अक्षरश: तोबा गर्दी होत असून खंडापूरात जणु पंढरपूर, देऊ आणि आळंदी अवतरल्याचा भास होत आहे. या सप्ताहाचा समारोप सोमवारी होणार असल्याने दिवसेंदिवस भाविकाची गर्दी वाढत आहे.
खंडापूरच्या शिवारातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उत्सव संतांचा..क़ुंभमेळा वारक-यांचा दि. २२ फेब्रुवारीपासून सुरु आहे. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी संगीत गाथा पारायण, कीर्तन सेवा, हरिपाठ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा, कीर्तन सेवा, संगीत भजन, २४ तास अखंड संतांचा नामजप पारायण सोहळा सुरु आहे. हभप विठ्ठल महाराज दिवेगावकर, हभप गहिणीनाथ महाराज औसेकर, हभप महेश महाराज माकणीकर, हभप माधव महाराज ढाकणे, हभप श्रीगुरु माधव महाराज नामदास, हभप अच्युत महाराज दस्तापूरकर, हभप माधव महाराज पंढरपुरकर, हभप एकनाथ महाराज सदगीर, हभप विठ्ठलदादा वासकर, हभप कान्होबा महाराज देहूकर, हभप महादेव महाराज राऊत, हभप चंद्रशेखर महाराज देगलूकर, हभप अॅड. जयवंतराव महाराज बोधले यांची कीर्तन सेवा झाली. आज दि. १ मार्च रोजी हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन होणार आहे. उद्या दि. २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत होत असलेल्या उत्सव संतांचा… कुंभमेळा वारक-यांचा या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी पंचक्रोशीतील २ हजार तरुण आणि १ हजार महिला स्वयंसेवक कष्ट करीत आहेत. भाविकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष सिटी बसची सोय करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचीही चोख व्यवस्था आहे. हा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक एकतेचे दर्शन आहे.
दररोज १ लाखाहून अधिक भाविकांसाठी महाप्रसाद
उत्सव संतांचा..क़ुंभमेळा वारक-यांचा या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे येथील ‘महाप्रसाद’ समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील गावागावांमधून दररोज १० लाख भाकरी, चपाती आणि कोंदीच्या पोळ्या संकलित केल्या जात आहेत. सुमारे १० ते १५ टेम्पो भरून हा प्रसाद खंडापुरात पोहोचत आहे. सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत अखंडपणे भोजन कक्ष सुरु आहे. दररोज १ लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. सप्ताह परिसरात केवळ धार्मिक विधीच नाही तर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि बारा ज्योतिर्लिंग आध्यात्मिक महातीर्थ महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.

