लातूर : प्रतिनिधी
शहरातील कन्हेरी चौकाकडून राजीव गांधी चौकाकडे एक भरधाव ट्रक जात असताना या ट्रकने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गिल्डा टायरच्या समोर धडकला. यावेळी रस्त्यावरुन चालत जाण-या दोघांना या ट्रकने उडवले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
रत्नागिरी-नागपूर महामार्ग शहरातून गेला आहे. या मार्गावर दररोज अपघात होत आहेत. त्यातच बेशिस्त वाहतूक बोकाळल्याने अनेकांचा नाहक बळी जात आहे. शुक्रवारी दुपारी कन्हेरी चौकाकडून राजीव गांधी चौकाकडे एक भरधाव ट्रक निघाला होता. या ट्रकचा वेग इतका होता की, ब्रेक दाबताच ट्रकने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध बाजूच्या रोडवर जाऊन धडकला. ट्रक धडकल्याने मोठा आवाज आला, ट्रकने दोघांना उडवल्याने किंचाळ्या ऐकु आल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर तेथील नागरिकांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात पाठवले. तिथे एका जखमीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातातील मृत व जखमींचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाहीत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

