19.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपकडून सतत शिवाजी महाराजांचा अपमान

भाजपकडून सतत शिवाजी महाराजांचा अपमान

मालवणमधील पुतळा प्रकरणावरून पटोलेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचाराचे सरकार नाही, ते सतत महाराजांचा अपमान करत असतात, अशी टीका केली आहे.

दरम्यान, नाना पटोले म्हणाले, हे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा सतत अपमान करत आले आहेत. हे सरकार कमिशनखोर आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचे हे सरकार नाही. १ रुपयाची वस्तू १० रुपयांत विकत घेतली जाते. मूर्तिकाराचा अनुभव नसतानासुध्दा मूर्तीचे काम दिले.

२३६ कोटी मूर्ती बनवायला आणि ५ कोटी रुपये सुशोभीकरण करायला खर्च केला आहे. राज्य सरकार म्हणते की, आमचा दोष नाही केंद्र सरकारचा दोष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर छत्रपतींचा अपमान करायला उठले आहेत. भाजप शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे.
मोदी ज्याला हात लावतात ते खराब होत आहे. अधिकारी किंवा कंत्राटदार यांचा दोष नसून राज्य सरकारच दोषी आहे. सरकारने स्वत: माफी मागून पायउतार व्हावे, अशा शब्दांत पटोले यांनी हल्लाबोल केला.

राज्यात महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारांवर लगाम नाही. मुंबई-गोवा महामार्गावर पाहणी करून किती मलिदा खायचा याची पाहणी करण्यासाठी ते गेले होते, असे म्हणत पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. बदलापूरमधील घटना झाली त्यामध्ये आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस बघ्याच्या भूमिकेत असून गुंड लोकांना वाय प्लस सुरक्षा दिली जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR