जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या संबंधित रेव्ह पार्टी प्रकरणावरून जळगावचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. पुण्यातील या प्रकरणात प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
यावर खडसेंनी चाकणकर यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर देत ‘त्या चेकाळल्या’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जळगावात खडसेंविरोधात आंदोलन केले. यामध्ये काही कार्यकर्त्यांनी खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारले आणि एकाने तर थुंकण्याची हद्द पार केली.
या आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या गैरवर्तनावर भाजपचे वरिष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे योग्य नाही, असे करणे चुकीचे आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मी गेल्या चार दिवसांपासून उत्तराखंडमध्ये होतो, त्यामुळे मला याची माहिती नव्हती. पण असे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. महाजन यांनी या प्रकरणात कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले, पण त्यांच्या या प्रतिक्रियेमुळेही वाद पूर्णपणे शमला नाही.
रक्षा खडसेंची हळहळ
खडसेंच्या कुटुंबातीलच आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. मलाही आता वेदना होत आहेत. राजकारणाची ही पातळी खूप खालावली आहे. कुठेतरी याला थांबायला हवे, असे रक्षा यांनी सांगितले. त्यांनी खडसे आणि महाजन यांच्यातील मतभेद मिटवून जळगावच्या विकासासाठी एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, पण हे आंदोलन त्यांच्या या अपेक्षेला छेद देणारे ठरले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रत्युत्तर
खडसेंविरोधातील आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटानेही जळगावात आंदोलन केले. खडसेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत भाजपच्या आंदोलनाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खडसेंना पाठिंबा दर्शवला. यामुळे जळगावातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

