22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रभाजपचा विजयी जल्लोष

भाजपचा विजयी जल्लोष

नगर परिषद निवडणुकीत मुसंडी, सर्वाधिक जागांवर विजय

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील मिनी विधानसभा म्हणून राज्याचे लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. त्यामुळे सकाळपासूनच भाजपने विजयाचा जल्लोष केला. भाजपने जवळपास १२९ जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेने ५४ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४० जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजप महायुतीने जवळपास सव्वादोनशे जागांवर विजय मिळवला. या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विजय टीम भाजपचा असून इतिहासातील सर्वांत मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात भाजपाचे १२९ नगराध्यक्ष विजयी झाले असून ३ हजारांपेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपाला २०१७ पेक्षा मोठा विजय मिळाला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे मोठे यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. भाजपने १२९ नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून महायुतीच्या तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते ७५ टक्के आहेत. नगरसेवकपदावर भाजपने नवा रेकॉर्ड केला. यापूर्वीच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे १६०२ नगरसेवक होते, आता त्याच्या दुपटीचे ३३०२ नगरसेवक आहेत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गेल्या २० ते २५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही, तो भाजप महायुतीला मिळाला. मी एकाही सभेत कुठल्याही पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात बोललो नाही. मी केवळ विकासाच्या बाबतीत बोललो, विकासाची ब्लू प्रिंट आम्ही लोकांसमोर मांडली. ही पहिलीच निवडणूक होती, ज्या निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याने कोणावरही टीका न करता एवढे मोठे यश मिळवले आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. टीम भाजपचा हा विजय आहे, लोकांच्या विश्वासाला आम्ही नक्कीच सार्थ ठरवू, विकासाला चालना देऊ, असेही फडणवीस यांनी म्हटले.

सर्व नेते, पदाधिका-यांनी घेतली मेहनत
३ हजारांच्या आसपास आमचे नगरसेवक निवडून आले असून सर्व मंत्र्यांनी आणि पदाधिकारी यांनी निवडणुकीत मोठी मेहनत केली. जवळपास १ लाख ६ हजार बूथवर काम करणा-या कार्यकर्त्यांनी ताकदीने परिश्रम घेतले. अमित शाह म्हणतात ५१ टक्के लढाई संसद ते पंचायत कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेऊन लढली पाहिजे. त्यानुसार कोणत्याही नरेटिव्हला बळी न पडता आम्ही या निवडणुका जिंकल्या आहेत. लोकसभेला त्यांनी खोटा नरेटिव्ह पसरवला. परंतु आता ते यशस्वी झाले नाहीत. खोटा नरेटिव्ह त्यांनी यादेखील निवडणुकीत पसरवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते यशस्वी झाले नाहीत, अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली.

फडणवीसांनी रोडमॅप तयार केला : चव्हाण
देवेंद्र फडणवीस यांनी रोडमॅप तयार केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा मॅप असणार आहे. सरकार मायबाप म्हणून कसे राहिल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अचानक आलेला पाऊस, झालेल नुकसान या सर्वांबाबत नियम शिथिल करून मदत करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंना उत्तर मिळाले
राज्यात २८८ ठिकाणी निवडणुका होत्या. या निवडणुकीत विरोधक नव्हते. उद्धव ठाकरे म्हणाले होते, महाराष्ट्रातील जनतेला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनेसुद्धा त्याच प्रकारे कौल दिला. २ आकडीदेखील संख्या त्यांना ओलांडता आली नाही, अशी टीकाही रविंद्र चव्हाण यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR