कोल्हापूर : प्रतिनिधी
कालपर्यंत विरोधी पक्षनेत्यांच्या घरावर इडीची छापेमारी होत असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत होत्या. पण आता मात्र ईडीने कोल्हापुरातील भाजपच्या नेत्याच्या घरावरच छापेमारी करत कारवाई केली आहे. हुजुरी येथील भाजप नेते आणि चांदी व्यावसायिकाच्या घरावर ईडीने छापा टाकत तब्बल १५ तास तपासणी केली. या तपासानंतर संबंधित व्यक्तीस मुंबईला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून, ईडीचे पथक कोल्हापुरातून रवाना झाले आहे. या घटनेने परिसरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुपकी येथील महावीरनगरमधील चांदी व्यावसायिक आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष भारत लठ्ठे यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक ईडीचे अधिकारी घरी दाखल झाल्यामुळे लठ्ठे कुटुंबीय चांगलेच घाबरले होते. या छापेमारीदरम्यान अधिका-यांनी जवळपास १५ तास भारत लठ्ठे यांची चौकशी केली.
भारत लठ्ठेंच्या घरावर आणि कार्यालयावर ‘ईडी’ने छापा टाकल्याची बातमी गावात वा-यासारखी पसरली. त्यामुळे बघ्यांचीही गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. या छाप्याबाबत अधिकृत माहिती देण्यास किंवा घटनास्थळी प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. अत्यंत गुप्तता पाळत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या कारवाईतून नेमकी कोणतीही माहिती मिळाली, काय निष्पन्न झाले याबाबतचा अधिकृत तपशील समोर आला नाही. ईडीच्या पथकात सहा अधिका-यांचा सहभाग होता. महत्त्वाची बाब म्हणजे या अधिका-यांनी पहाटे चार वाजताच निधी बँक कार्यालय ताब्यात घेतले होते.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत, चांदी व्यवसाय, निधी बँक आणि दुबईमधील शेअर मार्केटसारख्या विविध उद्योगांमुळे संबंधित उद्योजकाच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती सातत्याने मोठी होत चालल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी दुबईसह अनेक परदेश दौरे केले असून, याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
शुक्रवारी पहाटे सुमारे ४.३० वाजता बंदूकधारी कमांडोंसह ईडीच्या अधिका-यांनी भारत लठ्ठे यांच्या निवासस्थानी आणि निधी बँकेच्या कार्यालयावर छापा टाकला. मात्र, त्या वेळी संबंधित उद्योजक आणि त्यांचा मुलगा घरी आढळले नसल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापुरातील त्यांच्या भागीदाराच्या निवासस्थानी ईडीने एकाचवेळी कारवाई केल्याचे समजते. या धाडसत्रामुळे व्यापारी व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.