नागपूर : प्रतिनिधी
निवडणुकीत ध्रुवीकरण करण्याची भाजपची जुनी परंपरा आहे. ध्रुवीकरण केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही. त्यांना यशही मिळत नाही. ते मते मिळवण्यासाठी प्रांतवाद आणतील, पण बोट दुस-याकडे दाखवतील. धर्मवाद आणतील, पण बोट दुस-याकडे दाखवतील. या सगळ्या गोष्टी ते आणतील. सगळ्या प्रकारचे फंडे करून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची हा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर केली.
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलावण्याच्या मुद्यावरूनही भाजप व महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांत योगींची गरज वाटत असेल, तर हे भाजपचे अपयश आहे. राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्ष जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत. त्यामुळे भाजपवर दुस-या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून पास होण्यासाठी मदत घेण्याची वेळ आली आहे. योगींची गरज वाटते म्हणजेच आपल्या हेडमास्तरला वर्ग सांभाळता येत नाही. त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळायचा अशी परिस्थिती दिसत आहे.
त्यात त्यांनी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीच्या चर्चेसह विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. सध्या दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे. पण शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ही चर्चा फिस्कटल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, दुस-याच्या घरात काय चालले आहे ते डोकावून पाहण्याचा अधिकार मला नाही. पण त्यांच्या चर्चा पुढे खूप गेल्याचे मी ऐकले आहे. त्यांच्यात घड्याळावर लढा व तुतारीवर लढा असा विषय सुरू आहे. ज्यावेळी यासंदर्भात त्यांच्या बैठका झाला, त्याचवेळी आम्ही निर्णय घेतला की, शरद पवार अजित पवारांसोबत जात असतील तर आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची.
राजकारणाचा चिखल
आज राजकारणात पक्ष बदलाबदलीचा जो धिंगाणा चालू आहे. हा सगळा धिंगाणा जनता पाहत आहे. कुणाचा पायपोस कुणाशी नाही. वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या व युत्या होत आहेत. राजकारणाचा चिखल झाला आहे. त्या चिखलात सर्वांच्या अंगावर डाग पडत आहेत. कितीही धुतले तरी हे डाग साफ होतील असे दिसत नाही. एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण व गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्रात पहिल्यांदाच निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदेंनी ज्योतिषाकडे जावे
भाजपने एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणा-या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढला. एकनाथ शिंदे यांच्या मागे सध्या राहु किंवा शनिदोष आहे का? याची खात्री त्यांनी एखाद्या ज्योतिषाला भेटून करावी, असे ते म्हणाले.

