नितीशकुमारांचा राजीनामा, भाजपचा प्रथमच मुख्यमंत्री
नितीश-लालू पर्व संपुष्टात
पाटणा : वृत्तसंस्था
देशात ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू असतानाच बिहारच्या राजकारणात बदलाचे वारे वाहत आहे. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यामुळे आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच भाजपने सम्राट चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही एका अर्थाने उलथापालथच मानली जात आहे. कारण पहिल्यांदाच राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होत आहे.
नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ कामकाज पाहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे समर्थक आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांची काहीशी निराशा झाली. दिल्लीत जाण्यामागे नेमके काय कारण आहे, हे समोर आले नसले तरी केंद्र सरकारसमवेत ते देशपातळीवर काम करणार आहेत. त्यासाठीच नितीश कुमार यांनी १० एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्लीत राज्यसभा सदस्य म्हणून खासदारकीची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. नितीश कुमारांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात तयारी सुरू आहे. बिहारमधील सत्ताधारी जदयू आणि भाजपने मंगळवारी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीतच बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होणार होते. पण बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी यांनी भाजप आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून शिवराज सिंह उपस्थित होते. या बैठकीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली असून तेच बिहारचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत.
सम्राट चौधरी यांना
भाजपडकडून संधी
बिहारचे उपमुख्यमंत्री भाजप नेते सम्राट चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी होती. सम्राट चौधरी यांच्या घराची सुरक्षाही वाढविण्यात आली होती. याच सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी काही वर्षांपूर्वी डोक्यावर फेटा बांधला होता आणि जोपर्यंत नितीश कुमार यांना हटवणार नाही, तोपर्यंत डोक्यावरचा फेटा काढणार नाही अशी खूणगाठ बांधली होती. अखेर त्यांचे स्वप्न साकार झाले.

