औसा : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजपा महायुतीचे सर्व नेते एकत्रित लढणार आहेत, असे भाजपचे नेते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर वारंवार सांगत असतानाच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकारात पक्षीय राजकारण नको, अशी भूमिका घेत माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा दावा फोल ठरला. दरम्यान, आता औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या सुविद्य पत्नी शोभाताई अभिमन्यू पवार बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. त्यामुळे माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पॅनलला दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आधी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आणि आता आमदार अभिमन्यू पवार यांनी महायुतीला धक्का दिल्याने लातूर जिल्ह्यातील भाजपा एैक्याला तडे गेल्याचे चित्र आहे.
निलंगा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून अरविंद पाटील निलंगेकर व त्यांच्या काकू संगीता अशोक पाटील निलंगेकर यांच्यात निवडणूकहोणार आहे. आता शोभाताई पवार यांची बिनविरोध निवड होत असल्याने निलंगा मतदारसंघावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. निलंगा मतदारसंघातील कासार सिरसी व कासार बालकुंदा हे दोन गट हे औसा विधानसभा मतदारसंघात येतात. या दोन्ही गटांवर आमदार अभिमन्यू पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या गटातील मतदार आमदार अभिमन्यू पवार व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याच उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता आहे.
तिघांची माघार; शोभाताई पवार बिनविरोध
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत औसा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा अभिमन्यू पवार यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या गोरख सावंत, विश्वनाथ बिराजदार आणि युवराज बिराजदार या तिघांनी माघार घेतल्याने शोभाताई पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जळकोट मतदारसंघातून राजूरकर यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा
जळकोट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकपदी आशिष पाटील राजूरकर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. याच मतदारसंघातून बाजार समितीचे माजी संचालक बाबूराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु दि. २९ ऑक्टोबर रोजी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राजूरकर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. जळकोट तालुक्यातून आशिष पाटील राजूरकर, बाबूराव जाधव, बँकेचे माजी संचालक तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धर्मपाल देवशेट्टे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधून धर्मपाल देवशेटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला. यानंतर आशिष पाटील राजूरकर व बाबूराव जाधव या दोघांचे अर्ज शिल्लक राहिले होते. आता जाधव यांनी उमेदवारी मागे घेतल्याने राजूरकर यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती पांडे, ज्येष्ठ नेते बाबूराव जाधव, बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पवार, संभाजी कोसंबे, पंचायत समिती उपसभापती माधव वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सचिन केंद्रे, रमण अदावळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, माजी सभापती बालाजी ताकबिडे, मेहताब बेग, माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ इंद्राळे, संग्राम कांबळे शिंदगीकर यांच्यासह विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे सर्व चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांनी अभिनंदन केले आहे.
















