ठाणे : प्रतिनिधी
बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकारातील सहआरोपी तुषार आपटे याला भाजपने बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले होते. भाजपच्या या निर्णयाचा राज्यभरातून निषेध झाल्यानंतर आता तुषार आपटे याने स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. शाळेची बदनामी होऊ नये आणि भाजपला त्रास होऊ नये यासाठी मी राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्याने माध्यमांना दिली. दरम्यान, तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणे हा भाजपचा राजकीय व्यभिचार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती.
माध्यमांशी संवाद साधताना तुषार आपटे म्हणाला की, ‘मी स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देत आहे. शाळेला, आदर्श विद्यामंदिर संस्थेला आणि भाजप पक्षाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मी हा राजीनामा स्वत:हून देत आहे’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली. ४ नगरसेवक निवडून आणल्याबद्दल भाजपने त्याला स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले होते, याबाबत विचारले असता त्याने त्यावर बोलणे टाळले. शाळेची आणि भाजपची कोणत्याही प्रकारची बदनामी होऊ नये, यासाठी मी राजीनामा देत असल्याचा पुरुच्चार त्याने केला.
ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूर येथील एका प्रतिष्ठित शाळेत दोन लहान मुलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणी कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. यानंतर शाळा प्रशासनातील आणि व्यवस्थापन समितीमधील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याचवेळी तुषार आपटे याला सहआरोपी करण्यात आले. पण, या व्यक्तीला भाजपने बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त केले. या नियुक्तीवर राज्यभरातून रोष आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तुषार आपटेने भाजपचे नगरसेवक निवडून येण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली होती. याची परतफेड म्हणून आता भाजपने त्याला स्वीकृत नगरसवेक पदाचे बक्षीस दिले असल्याची चर्चा आहे.

