सातारा : ‘देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. यापूर्वी देशात अशी भ्रष्टाचारी सरकारे पाहण्यात आली नव्हती. निवडणुका आल्या की, उमेदवार विकत घ्यायचे, कोणाला माघार घ्यायला लावायचे, हेच काम भाजपचे आहे. त्यामुळे भाजपने लोकशाहीचा गळा घोटून आता लिलावही मांडला आहे, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे केला.
सातारा जिल्हा काँग्रेस भवनमध्ये नूतन जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांचा पदग्रहण समारंभ आणि कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी (दि. २६) झाला. यावेळी चव्हाण म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी करायची असेल, तर ती कराड तालुक्यातून सुरुवात करावी लागेल. यासाठी जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. आता पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यातूनच पुढील नवी लढाई सुरू होईल.
















