नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये २०२७ सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी नाशिकच्या पंचवटी भागातील तपोवन परिसरामध्ये साधुग्राम बांधण्यात येणार आहे. या साधुग्रामसाठी जवळपास १८०० झाडे तोडण्यात येणार आहेत. पर्यावरणप्रेमींनी याला विरोध केला असून नाशिककरांनी देखील त्याला पाठिंबा दिला आहे.
अशात भाजपाकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आजपासून १५००० झाडांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला गिरीश महाजन तसंच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख साधू महंत उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला र्त्यंबकेश्वरच्या १० तसेच नाशिकच्या ३ आखाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी १५ हजार वृक्ष लावले जाणार आहेत. आज पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी १००० वृक्षांचे रोपण करण्यात आले.
तपोवनातील झाडे तोडण्यावरून मला टार्गेट केले जात आहे. काही राजकीय विरोधकांनी तर माझे कार्टून काढलं मला लाकूडतोड्या म्हटले. मात्र माझे निसर्गावर प्रेम आहे. पंतप्रधानांचे देखील निसर्गावर प्रेम आहे. काहीजण बोलण्याच्या ओघात जास्त बोलून गेले. कुंभमेळ्याची गरज काय, साधू संत गांजा प्यायला येतात हे बोलणं आम्ही खपवून घेणार नाही. १५ हजार पैकी एकही झाड मरणार नाही. ही झाडे १३०० किलोमीटर वरून आम्ही आणली आहेत. मी स्वत: हैदराबादवरून राजमुंद्रीला गेलो पूर्ण एक दिवस देऊन झाडांची निवड केली. पहिल्या टप्प्यात १२ ते १५ फुटांची २००० झाडे आणली आहेत. इतरही झाडे लवकर येतील. गेल्या कुंभमेळ्यात जेवढ्या राहुट्या होत्या, तेवढ्याच यावेळी असणार आहे. आम्हाला काही झाडे, झुडूपे काढावी लागतील. जी झाडे काढली त्याचे दुस-या ठिकाणी पुनर्रोपण करू. गेल्यावेळेची झाडे ७० टक्के जगली आहेत, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

