निलंगा : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे सध्या पक्ष प्रवेशाचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब सूर्यवंशी (हालकी तालुका शिरूर अनंतपाळ) यांनी शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांसह आडीचशे चार चाकी वाहनांचा ताफा काढून भाजपातून काँग्रेसमध्ये निलंगा येथे जाहीर प्रवेश केल्याने भाजपाला मोठे भगदाड पडले आहे.
निलंगा शहरातील बस्वेश्वर मंगल कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकुणे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, संजय बिराजदार, डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, देवणी उपनगरध्यक्ष अमित मानकरी, गोविंद सूर्यवंशी, विठ्ठल पाटील, आंबादास जाधव, रमेश मदरसे, बाळासाहेब पाटील, सुतेज माने, ज्ञानेश्वर पाटील, गंगाधर चव्हाण, शकील पटेल, प्रमोद भदरगे, कारखाने, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मदन बिरादार, बालाजी वळसांगविकर, महेश देशमुख, अॅड तिरुपती शिंदे, अॅड. संदीप मोरे, बालाजी गोमसाळे, दिनकर बिरादार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान बाळासाहेब सूर्यवंशी यांनी अडीचशे चार चाकी वाहनांमध्ये शेकडो कार्यकर्ते आणल्याने वाहनांच्या ताफ्यामुळे निलंगा शहरांमध्ये चक्काजाम झाले होते. विशेष म्हणजे सूर्यवंशी यांनी भाजपातून अपेक्षेपेक्षा अधिक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याकरिता आणल्याने ऐनवेळी जागा कमी पडत असल्याने पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मंगल कार्यालयात घेण्यात आला.

