मोहमद सिराज, प्रसिद्ध कृष्णाचा भेदक मारा, कसोटी मालिका बरोबरीत
ओव्हल : वृत्तसंस्था
ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाने आपल्या विजयाची आणखी एक झालर चढवत अविस्मरणीय विजय मिळवला. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक मा-यामुळे टीम इंडियाचा थरारक विजय झाला आणि ओव्हल कसोटीत इंग्लंडवर ६ धावांनी मात केली. सिराजने दुस-या डावातील ५ विकेट्ससह सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आणि तोच विजयाचा खरा हिरो ठरला.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर आता २-२ अशी बरोबरी साधली.कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची तर भारताला ४ विकेट्सची आवश्यकता होती. पाचव्या दिवसाच्या पहिल्याच षटकात जेमी ओव्हरटनने २ चौके ठोकत इंग्लंडसाठी दमदार सुरुवात केली. मात्र, पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजने जेमी स्मिथला बॅक टू पॅव्हेलियन करत आजचा सामना रोमांचक बनवला. त्यानंतर सिराजने पुढच्या ओव्हरमध्ये जेमी ओव्हरटनला परत पाठवले आणि भारताला विजयाच्या अगदी जवळ आणले. पुढे सामना रोमांचक बनत गेला आणि अखेरच्या टप्प्यात भारताचा दणदणीत विजय झाला.
या सामन्यातील विजयानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने जेव्हा तुमच्याकडे प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज असतात, तेव्हा कर्णधार म्हणून काम करणे खूपच सोपे होते. गिलने ही मालिका सर्वाधिक ७५४ धावा करून पूर्ण केली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारत तिस-या स्थानी,
इंग्लंडला मोठा धक्का
ओव्हल टेस्टमधील विजयामुळे भारताला डब्ल्यूटीसी गुणतालिकेत मोठा फायदा झाला. या सामन्यापूर्वी भारत चौथ्या स्थानी होता. पण आता तो तिस-या स्थानी पोहोचला तर इंग्लंड चौथ्या स्थानावर घसरला. यामध्ये पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया, दुस-या स्थानी श्रीलंका आहे.

