चेन्नई : वृत्तसंस्था
चेन्नईच्या ऐतिहासिक चेपॉक स्टेडियमवर आज खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत टी-२० विश्वकप स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. या विजयामुळे भारताने केवळ गुणतालिकेत आपले खाते उघडले नाही तर सेमी-फायनलच्या शर्यतीत स्वत:ला जिवंत ठेवले आहे. आता सर्व नजरा १ मार्चला होणा-या वेस्ट इंडिजविरुद्धच्या महामुकाबल्यावर लागल्या आहेत. दरम्यान, झिम्बाब्वे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
अभिषेक शर्मा (५५) आणि हार्दिक पांड्या (५०) यांच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने टीम इंडियाने २० षटकांत चार गडी गमावून २५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ निर्धारित षटकांत ६ गडी गमावून केवळ १८४ धावाच करू शकला. त्यांच्याकडून ब्रायन बेनेटने ९७ धावांची नाबाद खेळी केली. भारताने झिम्बाब्वेला ७२ धावांनी हरवून उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. मात्र, मोठी खेळी करण्याची संधी संजूला (२४ धावा) साधता आली नाही. यानंतर अभिषेक शर्माने आपली लय कायम ठेवत शानदार अर्धशतक झळकावले. त्याला ईशान किशनची चांगली साथ मिळाली. दोघांनी दुस-या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत धावगती वाढवली. ईशानने २४ चेंडूत ४८ धावांची तुफानी खेळी केली. मात्र, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने त्याला बाद करत ही भागीदारी मोडली. अभिषेकने ३० चेंडूत ५५ धावा केल्या.
दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आक्रमक अंदाज कायम ठेवला. त्याने अवघ्या १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावांची झंझावाती खेळी केली. भारताने १७२ धावांवर चौथी विकेट गमावली असली तरी त्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. हार्दिक पंड्याने २३ चेंडूत नाबाद ५० धावा करत अर्धशतक पूर्ण केले. तिलक वर्मानेही नाबाद ४४ धावा ठोकल्या. या दोघांच्या तुफानी फटकेबाजीमुळे टीम इंडियाने २५७ धावांचा डोंगर उभारला.

